नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जर्मनीत सारब्रुकन इथं झालेल्या सार्लोर्लक्स खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद, भारताच्या लक्ष्य सेननं पटकावलं आहे. अंतिम फेरीत त्यानं चीनच्या हॉन्ग यान्ग वेन्ग याला १७-२१, २१-१८, २१-१६ असं तीन गेम्सच्या चुरशीच्या झुंजीत हरवलं. लक्ष्य जागतिक क्रमवारीत ७२व्या स्थानावर, तर वेंग १०२व्या स्थानावर आहे.

पहिल्या गेममध्ये पंधराव्या गुणापर्यंत चारच्या फरकानं आघाडीवर असतानाही लक्ष्यनं फाजील आत्मविश्वासात, टाळता येण्याजोग्या क्षुल्लक चुका करून हा गेम गमावला. नंतर मात्र या चुकांची पुनरावृत्ती टाळून त्यानं दोन्ही गेम जिंकत अखेर विजेतेपद पटकावलं.

या विजेतेपदामुळे लक्ष्यनं डच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेपाठोपाठ, सुपर हंड्रेड सिरीजचं हे सलग दुसरं विजेतेपद पटकावलं असून, या वर्षातली आपल्या आंतरराष्ट्रीय विजेतेपदांची हॅटट्रिक सुद्धा साजरी केली आहे. डच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या आधी त्यानं बेल्जियन इंटरनॅशनल चॅलेंज बॅडमिंटन स्पर्धाही जिंकली होती.