नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जी २० परिषदेनिमित्त भारत भेटीसाठी उत्सुक असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी म्हटलं आहे. अमेरिकेत वार्ताहरांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. ७ ते १० सप्टेंबरदरम्यान ते भारत दौऱ्यावर आहेत. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासोबत ते द्विपक्षीय चर्चाही करतील.
चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग या परिषदेला उपस्थित राहणार नसल्याचं वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिलं होतं. जिनपिंग यांची अनुपस्थिती दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया बायडेन यांनी दिली आहे. फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन, ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथोनी अल्बानीस, जर्मनीच्या चान्सलर ओल्फ शूल्झ, ब्रिटनचे प्रधानमंत्री ऋषी सुनक, जपानचे प्रधानमंत्री फुमिओ किशिदा आणि ब्राझिलचे राष्ट्रपती लुई इनासिओ लुला डि सिल्वा भारतात ९ आणि १० सप्टेंबर रोजी होणाऱ्या जी २० परिषदेसाठी उपस्थित राहणार आहेत.