नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतानं आरसेप अर्थात, प्रादेशिक सर्वंकष आर्थिक भागिदारी करारात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. भारताच्या चिंता आणि शंकांचं निरसन न झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बँकॉक इथं आर.सी.ई. पी. शिखर परिषदेतल्या भाषणात सांगितलं.

या परिषदेला अनेक जागतिक उपस्थित होते. या कराराच्या सध्याच्या रुपरेषेत मार्गदर्शक तत्वांची मुलभूत भावना पूर्णपणे प्रतिबिंबीत होत नाही, असं मोदी म्हणाले. भारत अधिक प्रादेशिक एकात्मता आणि मुक्त व्यापार तसंच नियम आधारित आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचं समर्थन करतो, असं ते म्हणाले. भारताच्या महत्त्वाच्या मुद्यांवर कुठल्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही, आणि त्यामुळेच राष्ट्रहित लक्षात घेऊन करारात सहभागी न होण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या सचिव विजय ठाकूर सिंह यांनी म्हटलं आहे.

चीन आणि आसियान देशांबरोबरच्या या करारात मूळ उद्देश दिसून येत नाही, असं त्या म्हणाल्या. आपल्या तीन दिवसांच्या बँकॉक दौर्‍यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विविध शिखर परिषदांमधे सहभाग नोंदवला, आणि विविध देशांच्या नेत्यांबरोबर द्विपक्षीय चर्चा केली.