नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक हवामान बदलासंदर्भातल्या पॅरिस करारातून बाहेर पडत असल्याचं, अमेरिकेनं संयुक्त राष्ट्राला औपचारिकपणे अधिसूचित केलं आहे. या कराराअंतर्गत अमेरिकेवर अन्यायकारक आर्थिक बोजा लादण्यात आला असं सांगत, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पीओ यांनी या करारातुन अमेरिका बाहेर पडत असल्याची घोषणा केली.

या अधिसूचनेमुळे अमेरिकेची या करारातून बाहेर पडण्याची एका वर्षांची प्रक्रिया सुरु झाली असून, ही प्रक्रिया पुढच्या वर्षी अमेरिकेत होणाऱ्या निवडणुकीनंतर संपेल. या करारामुळे, हवामान बदला विषयीच्या समस्या सोडवण्यासाठी १८८ देश एकत्र आले. या करारांतर्गत जागतिक तापमानवाढ रोखण्याच्या दृष्टीनं, आपल्या औद्योगिक स्तराच्या वरती २ अंश सेल्सियस तापमान सीमित ठेवण्यासह हे तापमान एक पूर्णांक पाच अंश सेल्सियस पर्यंत ठेवण्याचे प्रयत्न या देशांना करायचे आहेत. संपूर्ण जगात अमेरिकेकडून होणाऱ्या कार्बन उत्सर्जनाचा प्रमाण १५ टक्के आहे.