नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरिकांमध्ये समतेची भावना वाढीला लागण्यासाठी न्यायव्यवस्था मोठी भूमिका बजावत असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. संविधान दिवसाचं औचित्य साधून सर्वोच्च न्यायालयानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. न्यायव्यवस्था नागरिककेंद्रित होण्याचं महत्व त्यांनी अधोरेखित केलं. न्यायव्यवस्थेची गुणवत्ता सुधारण्यासाठी सर्वोच्च न्यायालय आणि न्यायालयाची खंडापीठं करत असलेल्या प्रयत्नांची त्यांनी प्रशंसा केली. भारतात सक्षम न्यायव्यवस्था असल्यामुळे इथल्या लोकशाहीला कधीही बाधा पोचणार नाही असा विश्वास राष्ट्रपतींनी व्यक्त केला. रात्रपतींनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण केलं. सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यावेळी उपस्थित होते.