नागपूर : वैद्यकीय क्षेत्रातील तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयांनी पुढाकार घेण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
विद्या शिक्षण प्रसारक मंडळांतर्गत लता मंगेशकर हॉस्पीटल परिसरातील भारतरत्न लता मंगेशकर यांच्या पुतळ्याचे अनावरण, रणजीत देशमुख सुपरस्पेशालिटी हॉस्पीटल विस्तारित इमारतीचे उद्घाटन, फिजिओथेरपी म्युझियम व रिसोर्स लर्निंग सेंटरचा शुभारंभ उपमुख्यमंत्र श्री फडणवीस यांच्या हस्ते आज झाला. त्यावेळी श्री फडणवीस बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री रणजीत देशमुख, कार्यकारी अध्यक्ष आशिष देशमुख, आमदार समीर मेघे, अधिष्ठाता डॉ. काजल मित्रा, उपअधिष्ठाता व वैद्यकीय अधीक्षक डॉ. नितीन देवतळे यावेळी उपस्थित होते.
आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्यांना आरोग्य सुविधा तसेच महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमुळे पाच लाख रुपयापर्यंत मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध झाली आहे. ग्रामीण भागातील जनतेला या सुविधेचा लाभ पोहचविण्याचे आवाहन यावेळी श्री.फडणवीस यांनी केले.
फिजिओथेरपी म्युझियमबाबत बोलताना सामान्यातील सामान्य माणसालाही कला व आधुनिकतेच्या संगमातून आरोग्य शिक्षण देणारे म्युझियम येथे तयार झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. लता मंगेशकर यांच्या नावाने देशातील पहिले वैद्यकीय हॉस्पिटल व शिक्षण संस्था नागपूर येथे रणजित देशमुख यांच्या पुढाकाराने सुरू केल्याबद्दलचा विशेष उल्लेख श्री. फडणवीस यांनी केला.
याप्रसंगी लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये पॅरामेडिकल अभ्यासक्रमाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच संस्थेच्या कामात महत्वाचे योगदान देणाऱ्या डॉ. आयुषी देशमुख्य, विजय सालनकर, प्रशांत सातपुते, डॉ. सुधीर देशमुख, संजय कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला.
आशिष देशमुख यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे संचालन श्वेता शेलगावकर यांनी केले तर आभार अधिष्ठाता डॉ. मित्रा यांनी मानले.
कार्यक्रमाला संस्थेचे संस्थापक डॉ. भाऊसाहेब भोगे तसेच डॉ. राजीव पोतदार, डॉ. निशांत धोडसे, रूपाली देशमुख, युवराज चालखोर, सुधीर देशमुख, डॉ. विलास ठोंबरे, डॉ. विकास धानोरकर, डॉ. अभय कोलते, डॉ. मनिषा देशपांडे, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.