मुंबई (वृत्तसंस्था) : इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी अमृत योजनेतून ७७२ कोटींचा प्रस्ताव सादर करणार असून, याबाबत संबंधित यंत्रणांची एकत्रित समिती स्थापन करण्याचा विचार केला जाईल, असं मंत्री दीपक केसरकर यांनी आज विधान परिषदेत सांगितलं.
शेतकऱ्यांच्या फसवणूक प्रकरणी वर्धा जिल्ह्यातल्या विदर्भ ॲग्रो सोल्युशन कंपनी विरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश तात्काळ दिले जातील, कंपनी विरोधात कारवाई केली जाईल, असं मंत्री अब्दूल सत्तार यांनी विधानपरिषदेत सांगितलं.
अकोला जिल्ह्यातल्या शिवनी इथल्या विमानतळाच्या धावपट्टीचा विस्तार पूर्वेकडे करण्याचा विचार असून, यावेळी अंदाजे ८०० लोकांचं स्थलांतर करावं लागेल. त्यासाठी एक उच्चस्तरीय बैठक आयोजित करून, मुख्यमंत्र्यांसमोर त्याचं सादरीकरण केलं जाईल असं मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितलं.