मुंबई : राज्याच्या मुख्य सचिवपदी डॉ. नितीन करीर यांची आज नियुक्ती करण्यात आली. डॉ. करीर यांनी मावळते मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्याकडून मुख्य सचिवपदाचा कार्यभार स्वीकारला.
नियुक्तीपूर्वी वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. करीर यांनी महसूल आणि वने तसेच नगर विकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून काम पाहिले आहे. डॉ. करीर एमबीबीएस आहेत. १९८८ मध्ये त्यांची भारतीय प्रशासकीय सेवेतनिवड झाली. त्यानंतर त्यांनी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केले. त्यानंतर त्यांनी सांगली, पुणे जिल्हाधिकारी म्हणून काम केले.
माहिती व जनसंपर्क महासंचालक, नोंदणी महानिरीक्षक, पुणे महापालिका आयुक्त, पुणे विभागीय आयुक्त अशा विविध पदांची जबाबदारी सांभाळली आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव, विक्रीकर आयुक्त, जमाबंदी आयुक्त या पदावरही काम केले आहे.
मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव विकास खारगे, सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, सामान्य प्रशासन विभागाचे (सेवा) अपर मुख्य सचिव नितीन गद्रे, अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमार यादव, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, उपमुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव आशिष शर्मा, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या प्रधान सचिव राधिका रस्तोगी, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, वन विभागाचे प्रधान सचिव वेणूगोपाल रेड्डी, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल, महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित सैनी यांनी मुख्य सचिव डॉ. करीर यांचे अभिनंदन केले.