नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. अशावेळी तरुणांनी यशाच्या संकुचित व्याख्येत न अडकता यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे, असं आवाहन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज केलं. ते नवी दिल्ली इथं इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या ३७ व्या दीक्षांत समारंभात बोलत होते. विद्यार्थ्यांनी स्पर्धात्मक यंत्रणांत वाहून जाऊ नये. तरुणांनी त्यांच्या योग्यतेनुसार उपलब्ध असलेल्या प्रचंड संधींचा लाभ घ्यावा, असं मार्गदर्शन उपराष्ट्रपती धनखड यांनी या वेळी केलं. तसंच विकसनशील देशाचा शिक्का भारतानं पुसून टाकला आहे. भारताचा उदय हा नित्य, वाढता आणि अखंड आहे, असंही ते म्हणाले. भारत त्यांच्या योगदानाची, त्यांच्या नवीन दृष्टिकोनांची आणि त्यांच्या नावीन्यपूर्ण कल्पनांची आतुरतेने वाट पाहत आहे, असंही ते म्हणाले.