नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि अमेरिका यांच्यातलं नातं विश्वास, परस्परांचा आदर आणि सामंजस्य यावर आधारित असून, ते अधिकाधिक बळकट होत गेलं आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

त्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना दूरध्वनीवरुन नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. परस्पर हिताच्या सर्व क्षेत्रांमधे सहकार्य वाढवण्यासाठी आपण उत्सुक अल्याचं त्यांनी सांगितलं. गेल्या वर्षी उभय देशांमधे धोरणात्मक भागीदारी दृढ झाली, याचा त्यांनी उल्लेख केला. अध्यक्ष ट्रम्प, त्यांचे कुटुंबिय आणि अमेरिकेचे नागरिक यांना उत्तम आरोग्य, उत्कर्ष आणि यश लाभो, अशा शुभेच्छा मोदी यांनी दिल्या.

गेल्या काही वर्षांमधे दोन्ही देशांमधले संबंध सुधारल्याबद्दल अध्यक्ष ट्रम्प यांनी समाधान व्यक्त केलं, आणि द्विपक्षीय सहकार्य अधिक सखोल करायला सज्ज असल्याचं सांगितलं. त्यांनी भारतीय नागरिकांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.