मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी भाजपाला सत्ता स्थापनेचं निमंत्रण दिल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपाला सत्ता स्थापनेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. सामना कार्यालयात आयोजित वार्ताहर परिषदेत त्यांनी सांगितलं की भाजपानं सत्ता स्थापनेसाठी एवढा वेळ घेणं योग्य नाही.

शिवसेना राजकारणात व्यापार आणत नाही. पैशांच्या जोरावर बहुमत विकत घेता येऊ शकतं हा भ्रमाचा भोपळा फुटल्याचं ते म्हणाले. अयोध्या निकालावर समाधान व्यक्त करत हा निकाल कोणा एका पक्षाचा नसून संपूर्ण भारताचा असल्याचं राऊत यांनी सांगितलं.

बेळगाव, कारवार प्रश्नी त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आजी माजी नेत्यांचं राऊत यांनी कौतुक केलं. कोणीही बहुमत सिद्ध करू शकलं नाही तर शिवसेना सत्ता स्थापनेचा दावा करेल आणि मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल असा पुनरुच्चार त्यांनी  केला.