मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भारतीय जनता पार्टीनं सत्ता स्थापन करण्याबाबत आपली भूमिका कळवावी, यासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांना आमंत्रण दिलं आहे.

२४ ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यापासून, गेल्या पंधरा दिवसांपर्यंत युती, आघाडी तसंच स्वतंत्रपणे कोणत्याही पक्षानं सत्तास्थापनेसाठी दावा केलेला नाही. त्यामुळे सरकार स्थापनेची शक्यता पडताळून पाहण्यासाठी राज्यपालांनी हा निर्णय घेतल्याची माहिती राजभवनानं प्रसिद्धीपत्रक जारी करून दिली आहे.

राज्यपालांनी भाजपाला दिलेलं निमंत्रण ही एक संवैधानिक प्रक्रिया असून, सत्ता स्थापनेबाबतचा निर्णय पक्षाच्या गाभा समितीच्या आज होणाऱ्या बैठकीत घेतला जाईल अशी प्रतिक्रिया भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. शिवसेनंदेखील जनादेशाचा आदर करावा असंही मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.

राज्यापालांच्या या निर्णयातू महाराष्ट्रात सरकार स्थापन व्हावं अशी त्यांची इच्छा असल्याचं दिसतं, त्यामुळे त्यांच्या या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.