नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल देशाला उद्देशून संबोधन केलं. सर्वोच्च न्यायालयानं राम मंदिर निर्माणाचा निकाल दिला आहे. आता प्रत्येक भारतीयानं राष्ट्र निर्माणाची जाबाबदारी घ्यावी, असं आवाहन त्यांनी केलं आहे. हा निर्णय घेताना न्यायालयानं सर्व पक्षांची बाजू ऐकून घेतली, त्यानंतरच सर्व सहमतीनं हा निकाल दिला.
यासाठी न्यायव्यवस्था अभिनंदनाला पात्र आहे. सर्व देशानं हा निकाल स्वीकारला, यातून विविधतेत एकतेचं मूल्य उजळून निघालं, भारताची लोकशाही मजबूत असल्याचं दर्शन सार्या जगाला घडलं, असं प्रधानमंत्री म्हणाले. आता भविष्याचा विचार करत नवभारत घडवूया, सर्वांना सोबत घेऊन ध्येय गाठूया, या नवभारतात कटुता आणि भय यांना स्थान नाही, असंही मोदी यांनी स्पष्ट केलं.