मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी भाजपानं असमर्थता दर्शवल्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिवसेनेला सरकार स्थापनेबाबत विचारणा केली आहे. शिवसेनेला आज संध्याकाळी साडे सात वाजेपर्यंत राज्यापालांना आपल्या भूमिकेबाबत कळवायचं आहे. भाजपा सरकार स्थापन करणार नाही, असं राज्यपालांना कळवण्यात आल्याचं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल जाहीर केलं.

त्यानंतर राज्यपालांनी शिवसेनेचे विधीमंडळ पक्ष नेते एकनाथ शिंदे यांना सरकार स्थापन करण्याची इच्छा आणि क्षमता याबाबत विचारणा केली. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक आज मुंबईत झाली. काँग्रेस पक्षाचा निर्णय झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आपला निर्णय जाहीर करेल, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी बैठकीनंतर बातमीदारांना सांगितलं.

महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थितीबाबत चर्चा काँग्रेस कार्यकारणीची बैठक सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी झाली. याबैठकीत ज्येष्ठ नेते अहमद पटेल, के. सी. वेणूगोपाल आणि मल्लिकार्जुन खर्गे उपस्थित होते. महाराष्ट्रातल्या नेत्यांची चार वाजता बैठक बोलवण्यात आली असून, त्यानंतरच  राज्यातल्या स्थितीबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, असं खर्गे यांनी बैठकीनंतर बातमीदारांना सांगितलं.

दरम्यान, या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारमधले शिवसेनेचे एकमेव मंत्री अरविंद सांवत यांनी मंत्री पदाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं आहे. ‘शिवसेनेची बाजू सत्याची असून, आपण केंद्रीय मंत्री पदाचा राजीनामा देत आहोत, असं ट्विट अरविंद सांवत यांनी केलं आहे.