मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. सत्तास्थापनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेत बोलणी सुरु असतानाच केंद्रीय मंत्रिमंडळ आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस आज केली. त्यावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केली.

निवडणूक निकालानंतर १५ दिवसांनीही राज्यात स्थिर सरकार स्थापन होऊ शकलं नाही, त्यामुळे राष्ट्रपती राजवटीची शिफारस केल्याचं राज्यपालांनी आपल्या अहवालात म्हटलं आहे. सर्वतोपरी प्रयत्न होऊनही सरकार, स्थापन होण्याची, शक्यता दिसली नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. घटनेतल्या तरतुदींनुसार राज्याचा कारभार होऊ शकत नाही, हे दिसल्यामुळे पर्याय उरला नाही, आणि घटनेतल्या ३५६ व्या कलमातल्या तरतुदीनुसार आपण ही शिफारस केल्याचं त्यांनी सांगितलं.

राष्ट्रपती शासन लागू असताना राज्य विधानसभा निलंबित राहणार असल्याचं अधिकृत सूत्रांनी स्पष्ट केलं आहे. याआधी १९८० आणि २०१४ मधे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली होती.