नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या किदम्बी श्रीकांत, एच. एस. प्रणॉय आणि पी. व्ही. सिंधूनं हाँगकाँग खुल्या बॅडमिंटन स्पर्धेची दुसरी फेरी गाठली आहे. समीर वर्मा, सायना नेहवाल, बी.साई प्रणित तसंच महिला दुहेरीत अश्विनी पोन्नप्पा-एन सिक्की रेड्डी, हे पहिल्या फेरीतच गारद झाले.

पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत आज जपानच्या केन्टो मोमोटा या जागतिक क्रमवारीतल्या पहिल्या स्थानावरच्या खेळाडूनं दुखापतीमुळे माघार घेतल्यानं पुढे चाल मिळून, श्रीकांत दुसऱ्या फेरीत पोहोचला, तर प्रणॉयनं पहिल्या फेरीत चीनच्या यू झिआंग हुआंग याला २१-१७, २१-१७ असं हरवलं.

कश्यपनं जपानच्या केन्टा निशिमोटोला २१-१८, १६-२१, २१-१० असं हरवलं. महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत सिंधूनं, दक्षिण कोरियाच्या गा यून कीम हिचा २१-१५, २१-१६ असा पराभव केला.