मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची शिफारस करून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्यघटनेची पायमल्ली केली असल्याची टीका काँग्रेसनं केली आहे. राज्यपालांनी प्रक्रिया पूर्ण न करताच राष्ट्रपाती राजवटीची शिफारस केल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते राणदीपसिंग सुरजेवाला यांनी केला आहे.

राष्ट्रपती राजवटीची शिफारस करायचा अहवाल पाठवण्यात राज्यपालांनी घाई केली, सत्तास्थापनेचे सर्व पर्याय पडताळून पाहिल्याशिवाय त्यांनी हा शिफारस केली असा आरोप राज्य काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी वार्ताहरांशी बोलताना केला. राज्यपालांची भूमिका पक्षपाती असून, राज्यपाल दबावाखाली आहेत की काय, असा संशय येतो, असं ते म्हणाले.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे तीनही पक्ष जेव्हा १४५ आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र सादर करतील तेव्हा राज्यपालांना सत्तास्थापनेसाठी बोलवायलाच लागेल, असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टिवार आणि सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितलं. राज्यपालांनी काँग्रेसलाही सत्तास्थापनेसाठी निमंत्रित करायला हवं होतं, असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.