नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. अधिवेशनाचं कामकाज २० सत्रांमधे चालणार आहे. पुढच्या महिन्याच्या १३ तारखेपर्यंत कामकाज चालेल. संसदेच्या दोन्ही सभागृहात नागरिकांचं कल्याण, सक्षमीकरण आणि भारताच्या विकासाच्या दिशेने सकारात्मक चर्चा घडून निर्णय घेण्यात येतील, अशी अपेक्षा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे.
नियमांनुसार सर्व विषयांवर चर्चा करण्यास सरकार तयार असल्याचं त्यांनी सर्वपक्षीय बैठकीत आश्वासन दिलं आहे. बैठकीला गृहमंत्री आणि भाजपा प्रमुख अमित शाह, काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद आणि अधिर रंजन चौधरी, तृणमूल काँग्रेस नेते सुदीप बंदोपाध्याय आणि डेरेक ओब्रायन, एलजेपीचे चिराग पासवान, समाजवादी पार्टीचे राम गोपाल यादव, तेलगू देसमचे जयदेव गल्ला, बसपाचे सतीशचंद्र मिश्रा, एआयएडीएमचे नवनीत कृष्णा आणि डीएमकेचे टीआर बालू उपस्थित होते.
राज्यसभा अध्यक्ष एम. वेंकय्या नायडू यांनीही काल सर्वपक्षीय बैठक घेतली आणि सुरळीत कामकाजासाठी सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.