मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे. शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्यासाठी आघाडीतल्या घटक पक्षांनी पाठिंबा दर्शवल्यानंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची संयुक्त बैठक मुंबईत झाली.
या बैठकीला शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे, शिवसेना नेते एकनाथ शिंदे, सुभाष देसाई तर काँग्रेसकडून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल, प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि काँग्रेस सरचिटणीस वेणूगोपाल यांच्यासह प्रदेश काँग्रेसचे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार, जयंत पाटील आणि अन्य नेते उपस्थित आहेत.
त्यापूर्वी सकाळपासूनच शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीनही पक्षांच्या नेत्यांच्या आणि आमदारांच्या बैठकांचं सत्र सुरू होतं. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची आघाडीतल्या मित्रपक्षांशी चर्चा केली. या मित्रपक्षांनी शिवसेनेसोबत सत्ता स्थापनेसाठी आपल्याला पाठिंबा दिल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या बैठकीनंतर वार्ताहरांना सांगितलं.
सकाळी शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी शिवसेना नेते आणि आमदारांची बैठक झाली. तर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाली. विधिमंडळात प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस आमदारांची बैठक झाली.
मुख्यमंत्री शिवसेनेचाच राहील, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं मुख्यमंत्रीपदावर दावा केलेला नाही असं काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनी आज माध्यमांशी बोलताना सांगितलं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत हा आघाडीतल्या दोन्ही पक्षांचा आग्रह आहे, असं त्यांनी सांगितलं.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाबद्दल या शिवसेना आणि आघाडीच्या बैठकीत सर्वसहमती झाल्याचं शरद पवार यांनी या बैठकीनंतर सांगितलं. सत्ता स्थापन करण्यासंदर्भात सकारात्मक आणि योग्य दिशेनं चर्चा सुरु आहे. असं उद्धव ठाकरे यांनी माध्यमांना सांगितलं. यासंदर्भात उद्या वार्ताहर परिषदेत स्पष्ट होईल असं ते म्हणाले.