नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतानं काही देशांसोबत केलेल्या मुक्त व्यापार करारांचा देशातल्या निर्यातदारांना अपेक्षित फायदा झाला नाही, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं आहे, त्या चेन्नई इथं रामचंद्रन स्मृती व्याख्यानात बोलत होत्या.

प्रादेशिक सर्वंकश आर्थिक भागीदारी करार भारताच्या अपेक्षा पूर्ण करणारा नव्हता, त्यामुळेच भारतानं या करारात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला असंही सीतारमण यांनी सांगितलं. बँकिग क्षेत्रात नियमनप्रणाली अधिक कार्यक्षम करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्माला सीतारामन यांनी केलं.

काही सहकारी बँकांमधल्या कथित गैरव्यवहारांच्या अहवालांचा संदर्भ देत आर. बी. आय. नं आपल्या निरीक्षण आणि नियामक प्रणाली अधिक मजबूत करायला सुरुवात केली आहे, असं त्यांनी सांगितलं. बुडीत कर्ज प्रश्नावर बहुतांश बँकांनी उपाययोजना केल्या असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

सर्वोच्च न्यायालयानं वाहन उद्योगाला उत्सर्जन मानदंडात सुधारणा करण्यासाठी केवळ दोन वर्षांचाच कालावधी दिला, त्यामुळेच सरकारनं  वाहनांसाठी उत्सर्जन मानदंड ठरवाना भारत स्टेज ५ वगळून, भारत स्टेज ४ नंतर थेट भारत स्टेज ६ चे मापदंड लागू केले अशी माहिती त्यांनी दिली.