नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लष्करी व्यूहरचेनसह संपूर्ण हवाई सामर्थ्य मिळवण्यासाठी भारतीय हवाई दल निश्चित वेगानं प्रगती करत आहे. असं संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत भारतीय हवाई दलाच्या कमांडर्सच्या द्वैवार्षिक परिषदेत ते बोलत होते.

स्वदेशी शस्त्रांची रचना आणि विकास यासाठीच्या नव नव्या संधी हस्तगत करण्यासाठी हवाई दल करत असलेल्या प्रयत्नांच आणि दलाच्या व्यावसायिक दृष्टीकोनाचं त्यांनी कौतुक केलं. देशाला सर्वात सक्षम आणि लढाऊ सेना दिल्याबद्दल त्यांनी सर्व हवाई योद्धे आणि त्यांच्या कुटुंबियांची प्रशंसा केली. संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद यस्सो नाईक, संरक्षण सचिव डॉ अजय कुमार, एअर चीफ मार्शल आर. के. एस भदोरिया यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी या परिषदेला उपस्थित होते.

या परिषदेत संयुक्त कारवाया, ड्रोनविरोधी कारवाया, हल्लेविरोधी युद्धनीती, तसंच हवाईदलाच्या अचूक लक्ष्यवेधी तंत्रज्ञानाचं आणि सायबर तसंच माहितीविषयक लढाऊ क्षमतेचं सशक्तीकरण याबाबत चर्चा होणार आहे. या परिषदेचा समारोप आज होणार आहे.