पुणे : कोणतीही परिस्थिती लगेच बदलत नाही, ती बदलण्यासाठी संघर्ष करावा लागतो, या संघर्षातूनच बदल घडतो, ‘एक दिशा परिवर्तनाची’ सारख्या उपक्रमातून झोपडपट्टी वासियांचे सर्वांगाने पुनर्वसन होण्यास मदत होईल, असे मत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर यांनी व्यक्त केले.

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण आणि एक दिशा मन्वंतर यांच्या संयुक्त विद्यमाने लेकटाऊन येथील संक्रमण वसाहतीत ‘एक दिशा परिवर्तनाची’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ लेखिका इंदुमती जोंधळे, सुप्रसिद्ध सी. ए. अभिजित थोरात, ट्रेनर श्रीकांत गबाले, नगरसेवक बापू कांबळे, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे सचिव सुरेश जाधव, मुकुंद पवार, श्री. भालेराव आणि एक दिशा मन्वंतरच्या संचालिका अपर्णा चव्हाण आदी उपस्थित होते.

निंबाळकर म्हणाले, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण हळूहळू कात टाकत आहे. झोपडपट्टी धारकांना केवळ चांगली घरे बांधणे हा केवळ भौतिक बदल आहे. खराखुरा बदल व्हायचा असेल तर मानसिकतेत बदल झाला पाहिजे. सुसंस्कृत माणूस होऊन स्वतःचे व्यक्तिमत्व सुधारले पाहिजे. स्वच्छता ठेवणे, शिवीगाळ न करणे या गोष्टी प्राधान्याने केल्या पाहिजेत. विचारसरणीत बदल करून राहणीमानाचा दर्जा सुधारला पाहिजे. तो सुधारण्यासाठी प्राधिकरणाने पुढाकार घेतला आहे. हा कार्यक्रम त्याच पुढाकाराचा भाग आहे. प्राधिकरणाच्या माध्यमातून अशा प्रकारचा कार्यक्रम पहिल्यांदाच घेतला जात आहे. झोपडपट्टीवासियांचे सर्वांगाने पुनर्वसन व्हावे, यासाठीचा हा स्तुत्य प्रयत्न आहे.

ज्येष्ठ लेखिका इंदुमती जोंधळे म्हणाल्या, आपल्या घराचा स्वर्ग बनवणे आपल्याच हातात असते. दुसऱ्यांना आपल्या मनात सामावून घेण्यासाठी, चांगलं माणूस होण्यासाठी आपलं हृदय मोठं करावं लागतं. एकमेकांना जिंकून घेण्यासाठी माणुसकीचा धर्म जपला पाहिजे.

आयुष्य एकदाच मिळते ते समृद्ध करण्यासाठी वाचलं पाहिजे. वाचल्याने मन-बुद्धी श्रीमंत होते. एकमेकांशी प्रेमाने बोलायला पैसे लागत नाही, द्वेष करायला ही पैसे लागत नाही तर मग प्रेमाने वागायला काय हरकत आहे,असेही जोंधळे यांनी सांगितले.

थोरात म्हणाले, मी सुद्धा झोपडपट्टीतच वाढलो. आईने शिक्षणाचे महत्व ओळखून मला शिकवले. कोणत्याही कामाची मी कधी लाज बाळगली नाही. हे काम करत असताना मी सी ए होण्याचे स्वप्न पाहिले. मोठी स्वप्नं बघितली तरच ती साकार होऊ शकतात. चांगल्या गोष्टी आत्मसात केल्यावर कधीही कुणाचे अडत नाही, हे मी आयुष्याच्या प्रवासात शिकलो. कुणाला आपली दया आली नाही पाहिजे, असे ठरवल्यानेच इथपर्यंत पोहोचलो.

परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आपलीच आहे. स्वतःच्या आरोग्याची काळजी आपणच घेतली पाहिजे. जे चांगले आहे ते अजून चांगले करायचे असेल तर स्वतःच्या विचारात बदल केला पाहिजे, असे गबाले यांनी सांगितले.

पुनर्वसनाचा आनंद घ्यायचा असेल तर ते का, हे समजून घेतलं पाहिजे. शारीरिक आणि मानसिकतेतला बदल स्वतःत करायचा असेल तर स्वीकार महत्त्वाचा आहे. झोपडपट्टी धारकांमध्ये शारीरिक-मानसिक बदल घडवून आणण्यासाठी आणि त्यांच्या सर्व समस्या दूर करण्यासाठी हा कार्यक्रम आहे, असे अपर्णा चव्हाण यांनी सांगितले.

यावेळी बापू कांबळे, सुरेश जाधव यांनी मनोगत व्यक्त केले तसेच जयश्री क्षीरसागर, रवी डावरे यांनी झोपडपट्टी धारकांच्या वतीने मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला वसाहतीतील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अमृता देसर्डा यांनी सुत्रसंचालन केले. मुकुंद पवार यांनी आभार मानले.