पुणे : सध्याच्या लॉकडाऊन काळात पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. विभागात अंदाजे 46 हजार 36 क्विंटल अन्नधान्याची तर 8 हजार 455 क्विंटल भाजीपाल्याची आवक मार्केटमध्ये झाली आहे. विभागात 3 हजार 927 क्विंटल फळांची आवक तसेच कांदा-बटाटयाची आवक 19 हजार 404 क्विंटल इतकी झाली आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे.

पुणे विभागात 3 मे 2020 रोजी 101.97 लाख लिटर दुधाचे संकलन झाले असून 23.69 लाख लिटर दुधाचे पॅकेजिंग स्वरुपात वितरण झाले आहे. तर उर्वरित दूध सुट्टया स्वरुपात वितरित करण्यात आले आहे, असेही डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.

पुणे विभागात 33 हजार 912 स्थलांतरित मजुरांची सोय 1 लाख 5 हजार 712 मजुरांना भोजन

सध्याच्या लॉकडाऊन परिस्थितीत स्थलांतर केलेल्या मजुरांसाठी जिल्हा प्रशासनामार्फत 160 कॅम्प, कामगार विभागामार्फत 68 कॅम्प तर साखर कारखान्यांमार्फत 251 कॅम्प असे पुणे विभागात एकुण 479 रिलीफ कॅम्प उभारण्यात आले आहेत. या कॅम्पमध्ये 33 हजार 912 स्थलांतरित मजूर असून 1 लाख 5 हजार 712 मजुरांना भोजन देण्यात येत आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.