मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याचे १९ वे मुख्यमंत्री म्हणून शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईत शिवाजी पार्कवर पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. शपथविधी सोहळ्यासाठी शिवतीर्थावर भव्य मंच उभारण्यात आला होता. अलोट गर्दी करुन जनता उपस्थित होती. राज्यभरातून खास शपथविधी सोहळ्यासाठी 500 शेतकरी उपस्थित होते.
शपथविधीला शिवसेना, काँग्रेस तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, कार्यकर्ते आणि त्यांचे कुटुंबिय मोठ्या संख्येनं उपस्थित होते. सोहळ्यानिमित्त शिवाजी पार्क परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शिवसेनेचे गट नेते एकनाथ शिंदे, सुभाष देसाइ यांनी, राष्ट्रवादीचे काँग्रेसचे जयंत पाटील, आणि छगन भुजबळ यांनी तर काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
शपथविधीनंतर तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे यांचं अभिनंदन करणारं ट्वीट केलं आहे.