पुणे :  पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता 8 वी ) शाळांना शाळा माहिती प्रपत्र व ऑनलाईन आवेदन पत्र नियमित शुल्कासह भरण्यासाठी दि. 10 डिसेंबर 2019 पर्यंत द्वितीय मुदतवाढ देण्यात आली आहे. या परिक्षेसाठी ज्या शाळांनी अद्याप ऑनलाईन आवदेनपत्र भरलेले नसतील तर त्यांनी दि. 10 डिसेंबर 2019 पर्यंत प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी पत्रकाद्वारे केले आहे.

शिष्यवृत्ती परीक्षेची अधिसूचना परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in http://puppss.mscescholarshipexam.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. शिष्यवृत्ती परीक्षा दि. 16 फेब्रुवारी 2020 रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे. या परीक्षेचे नियमित शुल्कासह ऑनलाईन आवेदन पत्र भरण्यासाठी दि. 1 ते 30 नोव्हेंबर अशी मुदत देण्यात आली होती, तथापि आता ऑनलाईन आवेदन पत्र भरण्यासाठी नियमित शुल्कासह 10 डिसेंबर 2019 पर्यंत, विलंब शुल्कासह 11 डिसेंबर  ते 17 डिसेंबर 2019 पर्यंत, तर अति विलंब शुल्कासह 18 डिसेंबर ते 24 डिसेंबर 2019 पर्यंत तसेच अति विशेष विलंब शुल्कासह 25 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2019 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.

दि. 31 डिसेंबर 2019 नंतर ऑनलाईन अथवा ऑफलाईन पध्दतीने आवेदन पत्र भरता येणार नाही, असेही पत्रकात म्हटले आहे.