नागपूर : देशातील सुमारे 65 टक्के लोकसंख्या ही आदिवासी, ग्रामीण व कृषी अर्थव्यवस्थेवर अवलंबून असून कॉन्फडरेशन ऑफ इंडिया इंडस्ट्री (सीआयआय) यांनी आर्थिक दृष्ट्या सक्षम असलेल्या कृषी व कृषी प्रक्रिया उद्योगांमध्ये हातभार लावून अर्थव्यवस्थेला बळकटी द्यावी, असे आवाहन केंद्रीय रस्ते, वाहतूक महामार्ग मंत्री आणि केंद्रीय सुक्ष्म, लघू व मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपुरात केले. सीआयआय तर्फे आयोजित पाचव्या सुक्ष्म लघु मध्यम (एम एस एम ई) परिषदेप्रसंगी मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी सीआयआयच्या पश्चिम क्षेत्राचे सहसंयोजक सुधीर मुतालीक, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सह-मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक कृष्णा, एमएसएमई नागपूर विकास संस्थेचे संचालक पी.एम. पार्लेवार उपस्थित होते.
चीन सारख्या देशात बांबू आधारित अर्थव्यवस्थेमुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाली असल्याचे सांगून गडकरींनी राजस्व, वन तसेच ओसाड जमिनीवर बांबू लागवड करण्यासाठी व अखाद्य तेलबियांच्या लागवडीपासून जैव-इंधननिर्मितीकरीता उद्योजकांना पुढाकार घेण्याचे आवाहन केले.
आता उद्योग क्षेत्रांमध्ये लालफीत शाही कमी झाली असून उद्योगांवर लादलेल्या मर्यादांमध्येही कपात करण्यात आल्याचे त्यांनी सांगितल . वैश्विक अर्थव्यवस्था, मागणी व पुरवठा, व्यापार चक्र यावर अवलंबून असलेली भारतीय अर्थव्यवस्था रोजगार निर्मितीसाठी कटिबद्ध असून संपत्ती व रोजगार सृजन करणारे उद्योजकांनी नागपूर व विदर्भाच्या प्रगतीशील शहरांमध्ये गुंतवणूक करावी, अस आवाहन गडकरी यांनी केलं. कृषी, आदिवासी व ग्रामीण क्षेत्रावर आधारित अर्थव्यवस्थेचे महत्त्व सांगताना ते म्हणाले, आर्थिक विकासास उत्तेजन देण्यासाठी गरिबांची क्रयशक्ती वाढविणे आवश्यक आहे.
या एक दिवसीय एम एस एम ई परिषदेची संकल्पना “5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या भारतीय अर्थव्यवस्थेसाठी एमएसएमईचे सक्षमीकरण” अशी आहे. एक दिवसीय परिषदेत एमएसएमईमध्ये स्पर्धात्मकतेसाठी नव तंत्रज्ञानाचा वापर, सहजगत्या ऋण पुरवठा यावर विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व अधिका-यांची मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आली.
या परिषदेदरम्यान ‘केंद्रीत खरेदीदार- विक्रेता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि मोठे उद्योग समूह या मेळाव्यात खरेदीदार असून ते विदर्भातील एमएसएमई कडून उत्पादननिर्मितीच्या संधी शोधतील. या परिषदेला सीआय आयच्या पश्चिम क्षेत्राचे पदाधिकारी, उद्योजक उपस्थित होते.