नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : २०२४ सालापर्यंत भारतीय अर्थव्यवस्था पाच ट्रिलीयन डॉलर्सचा टप्पा गाठून जगातल्या पहिल्या पाच अर्थव्यवस्थांमधे स्थान मिळवेल, अशी आशा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केली आहे. मुंबईत ‘इकॉनॉमिक टाईम्स पुरस्कार’ सोहळ्यात ते बोलत होते.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या निश्चित निर्णय प्रक्रीयेमुळे देशाची अर्थव्यवस्था धोरण लकवा, घोटाळे आणि भ्रष्टाचार यातून बाहेर पडून पारदर्शक आणि धाडसी बनल्याचं प्रतिपादन त्यांनी केलं. गेल्या पाच वर्षात अर्थव्यवस्थेतले दोष दूर करण्याचं काम झालं आहे. आगामी पाच वर्षात मोठ्या आर्थिक सुधारणा होणार असल्याचं अमित शहा म्हणाले. मंदावलेली आर्थिक स्थिती तात्पुरती असून लवकरच भारतीय उद्योग आणि बाजार यातून मार्ग काढतील, अशी आशाही त्यांनी वर्तवली. देशात मोठ्या प्रमाणावर परकीय गुंतवणूक येत असून सरकार उद्योगक्षेत्राच्या मागे खंबीर उभं असल्याचंही ते म्हणाले.

२०१४ साली  अकराव्या क्रमांकावर असलेली भारतीय अर्थव्यवस्था सातव्या क्रमांकावर आल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं. सुलभ व्यवसाया संबंधित जागतिक बँकेच्या मानांकनात भारत २०२४ सालापर्यंत पहिल्या तीसात स्थान प्राप्त करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. क्षेत्रीय व्यापक आर्थिक भागीदारीमधे सामील न होण्याचा निर्णय भारतीय उद्योजकांच्या हितासाठीच घेतल्याचं सांगून अमित शहा यांनी चीन, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडबरोबर यापूर्वीच ‘मुक्त व्यापार करार’ झाल्याचं निदर्शनास आणलं.