पिंपरी : शहरातील कोणतीही दिव्यांग व्यक्ती शासनाच्या कल्याणकारी योजनांपासून वंचित राहणार नाही. दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले जातील, जेणेकरून त्यांच्यामध्ये असहाय्यतेची भावना निर्माण होणार नाही, असे मत आमदार लक्ष्मण जगताप यांनी व्यक्त केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नागरवस्ती विभागामार्फत दिव्यांग कल्याणकारी योजनेअंतर्गत प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड येथे महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या जागतिक दिव्यांग दिन या कार्यक्रमाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते संपन्न झाले त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी उपमहापौर तुषार हिंगे, स्थायी समिती सभापती विलास मडीगेरी, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, सहाय्यक आयुक्त तथा नगरसचिव उल्हास जगताप, समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले व मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव उपस्थित होते.

आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले, शहरातील दिव्यांग व्यक्तींना सर्वोतोपरी मदत करण्यासाठी महानगरपालिका कटिबद्ध आहे. 

महापौर उषा ढोरे म्हणाल्या, महानगरपालिकेच्या माध्यमातून दिव्यांगांना वर्षाला दिली जाणारी आर्थिक मदत दर महिन्याला कशी देता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. दिव्यांग व्यक्तींच्या सर्वांगीण विकासासाठी महानगरपालिका कटीबद्ध आहे असेही त्या म्हणाल्या.

यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या दिव्यांग व्यक्तींचा गौरव करण्यात आला. यामध्ये रामचंद्र तांबे, लता दुराफे, ऋतिका इंदलकर, शरद फलके, ज्ञानेश्वर गायकवाड, अशोक भोपळे, बाळू घुगे, श्रद्धा काटे, संपत पानसरे, आनंद बनसोडे, रमेश शिंदे आदींचा समावेश होता. 

यावेळी प्रा. संतोष कार्ले यांचे दिव्यांग व्यक्तींसाठी करिअर मार्गदर्शनपर व्याख्यानही झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त तथा नगरसचिव उल्हास जगताप यांनी केले तर सूत्रसंचालन प्रभारी माहिती व जनसंपर्क अधिकारी रमेश भोसले यांनी केले.