मुंबई : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 63 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी राज्यपाल म्हणाले, आपण सर्व मिळून बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत घडविण्याचा प्रयत्न करुया. बाबासाहेबांचे विचार अनेक पिढ्यांना प्रेरणादायी आहेत. त्यांनी संविधानाच्या माध्यमातून देश एकसंध ठेवण्याचा प्रयत्न केला. संपूर्ण देश त्यांना आज अभिवादन करीत आहे. मीसुद्धा त्यांना विनम्र अभिवादन करीत आहे, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, बाबासाहेबांचे जीवन हे धगधगते अग्निकुंड होते. सामान्य माणसांना माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी लढा उभारला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे  परळ दामोदर हॉलजवळील, बीआयटी चाळ येथे 22 वर्षे वास्तव्य होते. ते निवासस्थान राष्ट्रीय स्मारक म्हणून विकसित करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मंत्री जयंत पाटील, सुभाष देसाई, बाळासाहेब थोरात, आमदार आदित्य ठाकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी आदी उपस्थित होते.

राज्यपाल श्री. कोश्यारी, विधानसभा अध्यक्ष श्री. पटोले, मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते श्रीमती कमला मेहता अंधशाळा दादर येथील अंध विद्यार्थ्यांना भेट वस्तूंचे वाटप करण्यात आले. तसेच डॉ. आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित केलेल्या छायाचित्र प्रदर्शनाला त्यांनी भेट दिली.