भोसरी : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आजीवन अध्ययन व विस्तार विभाग आणि राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय लांडेवाडी, भोसरी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 6 डिसेंबर 2019 रोजी भारतीय संविधान अर्धदिवशीय कार्यशाळा संपन्न झाली.

कार्यशाळेच्या प्रथम सत्रात प्राचार्य डॉ. गौतम भोंग यांनी कार्यशाळेचे प्रास्ताविक करताना सांगितले की, स्वातंत्र्य, समता ,बंधुता, न्याय आम्हाला संविधानाने शिकवले. म्हणूनच भारतात वेगवेगळ्या जाती-धर्माचे लोक शांततेने आणि समानतेने राहतात. प्राचार्य प्रदीप कदम यांनी विद्याभ्यास हे विद्यार्थ्यांचे दैवत आहे. भूतकाळ आणि भविष्यकाळ यांच्यामधला वर्तमान काळातला दूत आजचा विद्यार्थी आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान तयार करण्यासाठी 60 देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास केला. भारतीय राज्य घटना तयार करण्यातसाठी  2 वर्ष 11 महिने 18 दिवस एवढा कालावधी लागला. या उदाहरणाने महामानवांनी अभ्यास म्हणजे काय? आपलं काम सुंदर कसं असावं? हे दाखवून दिलं. संविधानापुढे उच्च-नीच भेदभाव होत नाही. प्रत्येकाचं रक्त लालच असते म्हणूनच प्रत्येकाच्या ओठातून जिव्हाळ्याची भाषा पाझरली पाहिजे. गंगेपेक्षा पवित्र आणि हिमालयापेक्षा जास्त उंचीची माणसं भारताने जगाला दिली. आपल्या विचारांनी विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध करत त्यांनी विद्यार्थ्यांना रोज कमीत कमी एक पान संविधानाचे वाचण्याचा संदेशही दिला .

कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात प्राध्यापक चक्रधर टिळेकर यांनी विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्त्व पटवून दिले. राष्ट्र एकसंघ राहण्यासाठी संविधानाची गरज आहे युवकांनी महामानवाची प्रेरणा घेऊन आदर्श जीवन निर्माण केले पाहिजे असे सांगितले. या कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन प्राध्यापक सुदाम गोडगे यांनी केले, तर आभार प्राध्यापक दीपक पावडे यांनी मानले. या कार्यशाळेसाठी प्राध्यापक मारुती शिंदे, प्राध्यापक डॉ. सजित खांडेकर, प्राध्यापक कमलेश जगताप, प्राध्यापक अनिल गंभीरे, प्राध्यापिका सविता विर, प्राध्यापिका डॉ.पौर्णिमा कोल्हे, प्राध्यापिका मीनाक्षी मांढरे, प्राध्यापिका रेश्मा लोहकरे यांनी सहकार्य केले. तसेच या कार्यशाळेसाठी 160 विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला.