विद्यार्थ्यांच्या आरोग्याची घेतली जातेय काळजी

पिंपरी : चिंचवड येथील नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूलने विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी एक नवीन उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. ‘पाणी प्या – निरोगी राहा” असे या उपक्रमाचे नाव आहे. त्याव्दारे दैनंदिन जीवनात पाण्याचे महत्व आणि आरोग्य विषयक फायदे लक्षात आणून देण्याचा प्रयत्न‌ केला जात आहे.‌
केरळ राज्याचे शिक्षण मंत्र्यांनी केरळ मधील सर्व शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. केरळ राज्यातील सर्व शाळांमध्ये दैनंदिन शालेय तासिके दरम्यान तीन वेळा “वॉटर बेल” वाजविण्यात येते. यावरच आधारित  हा उपक्रम नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूलने राबविण्यास सुरुवात केली आहे.  “पाणी म्हणजे जीवन’  पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत आणि ते लक्षात घेऊन शाळेने हा उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे. ज्यामुळे शाळेच्या दिवसभराच्या संपूर्ण वेळेत दर एक तासांनी “वॉटर बेल ”  वाजविली जाते. ज्यामुळे शाळेतील विद्यार्थी, शिक्षक तसेच कर्मचारी यांनी पाणी प्यायचे आहे. नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूल अशा प्रकारचा उपक्रम राबविणारी पिंपरी – चिंचवड विभागातील पहिलीच शाळा ठरलेली आहे.
नॉव्हेल स्कूलचे संस्थापक अध्यक्ष अमित गोरखे म्हणाले की, “निरोगी आरोग्याच्या दृष्टीकोनातून भरपूर पाणी प्यावयास हवे. पण बरेचदा याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे अनेक आरोग्यविषयक तक्रारी निर्माण होतात. दररोज मानवी शरीरात चयापचय क्रिया व्यवस्थित चालावी यासाठी ४ ते ५ लिटर पाण्याची आवश्यकता असते, परंतु त्यात कमतरता निर्माण झाली तर निर्जलीकरण होते. भरपूर पाणी पिल्याने शरीराची चयापचय क्रिया, कार्यकारण क्रिया, सुरळीत चालते. ताण-तणाव कमी होतो. मन आनंदी व प्रसन्न राहते. या सर्व आरोग्यविषयक बाबी लक्षात घेता नॉव्हेल शाळेने हा उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे”.
 
नॉव्हेल स्कूलच्या प्राचार्या मानसी हसबनीस म्हणाल्या की, “शाळेच्या दैनंदिन तासिकेमुळे विद्यार्थ्यांना पाणी पिण्याची आठवण राहत नाही. त्यामुळे चक्कर येणे, घसा कोरडा पडणे, यासारख्या समस्या निर्माण होतात, त्यावर उपाययोजना म्हणून मुख्यत्वे विद्यार्थ्यांना शाळेतच नव्हे तर घरी सुद्धा नियमित पाणी पिण्याची सवय लागावी हा यामागचा उद्देश आहे”.