प्रधानमंत्री आणि राष्ट्रपतींनी व्यक्त केलं तीव्र दुःख / आगीच्या घटनेच्या चौकशीचे राज्यसरकारचे आदेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीच्या मध्यवर्ती भागात राणी झाशी मार्गावरच्या घाऊक धान्य बाजारातल्या तीन मजली इमारतीला सकाळी लागलेल्या आगीत 43 जणांचा मृत्यू झाला आहे. अग्निशमन दलाच्या 25 गाड्या घटनास्थळी पोचल्या आणि त्यांनी आग आटोक्यात आणली सुमारे 50 जणांना या आगीतून सुखरुप वाचवण्यात अग्निशमन दलाला यश आलं. मृतांमधे तसंच जखमी झालेल्या 56 जणांमधे मुख्यत्वे मजुरांचा भरणा आहे. त्यांच्यापैकी अनेकांना धुरामुळे गुदमरण्याचा त्रास होत असून, त्यांना राममनोहर लोहिया, जयप्रकाश नारायण आणि हिंदूराव रुग्णालयात भर्ती करण्यात आलं आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं असून, मृतांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं आहे, तसंच जखमी झालेल्यांना लवकर बरं होण्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. या भयानक घटनेमुळे आपल्याला धक्का बसला असून, मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. आवश्यक ती सर्व मदत तातडीनं देण्यात येत असल्याचंही प्रधानमंत्र्यांनी सांगितलं.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. घटनास्थळी तातडीनं मदत पुरवण्यात आली असल्याचं तसंच या घटनेबद्दल तीव्र दुःख झाल्याचं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही मृतांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं असून, जखमींना बरं वाटण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. या दुर्घटनेच्या दंडाधिकारीय चौकशीचे आदेश दिल्ली राज्यसरकारनं दिले असून, येत्या सात दिवसात अहवाल मागवला आहे. तसंच मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी दहा लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी एक लाख रुपयांचं अर्थसहाय्य जाहीर केलं आहे.

केंद्रीय नागरी विकास मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी घटनास्थळाल भेट देऊन मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. दिल्ली भाजपा प्रदेशाध्यक्ष  मनोज तिवारी यांनीही घटनेबाबत दुःख व्यक्त केलं आहे. प्रथमदर्शनी हा अपघात शॉर्टसर्किटमुळे झाला असून, श्वास कोंडल्यामुळे लोकांचा मृत्यू झाल्याचं त्यांनी सांगितलं.