नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वाडा अर्थात, जागतिक उत्तेजक चाचणी विरोधी संघटनेनं रशियावर जागतिक क्रीडास्पर्धेत भाग घेण्यास बंदी घातली. टोकियो इथं २०२० मध्ये होणारी ऑलिंपिक स्पर्धा आणि २०२२ मध्ये बिजिंग हिवाळी ऑलिंपिक स्पर्धेचा बंदी आदेशात समावेश असून उत्तेजक चाचणी विरोधी प्रयोगशाळेतून चुकीची माहिती दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

शिफारशींची संपूर्ण यादी यासंदर्भात स्वित्झर्लंडमधल्या लौसाने इथं आज झालेल्या बैठकीत एकमतानं मंजूर केली असल्याचं संघटनेच्या प्रवक्त्यानं सांगितलं. या निकालाचा अर्थ असा आहे की, रशियाचे सर्व खेळाडू  टोकियो ऑलिंपिकमध्ये तटस्थ म्हणून भाग घेऊ शकतील आणि वाडा ज्या डोपिंगच्या व्यवस्थेला सरकार प्रायोजित मानते, त्या व्यवस्थेचा हे खेळाडू भाग नाहीत, हे त्याना सिद्ध करावं लागेल.