पुणे : शेतकरी हा समाजाचा कणा असून त्‍याच्‍या विकासासाठी आकाशवाणी देत असलेले योगदान उल्‍लेखनीय आहे, अशा शब्‍दांत वसंतदादा शुगर इन्‍स्‍टीट्यूटचे संचालक डॉ. विकास देशमुख यांनी आकाशवाणीच्‍या कार्यक्रमांचे कौतुक केले. मांजरी येथील संस्‍थेच्‍या सभागृहात ग्रामीण कार्यक्रम सल्‍लागार समितीच्‍या बैठकीत ते बोलत होते. यावेळी आकाशवाणीचे उपसंचालक गोपाळ अवटी, कार्यक्रम अधिकारी जगदीश राव, सुजाता परांजपे, बाहुबली टाकळकर यांची उपस्थिती होती.

डॉ. देशमुख म्‍हणाले, कृषी तंत्रज्ञानात मोठे बदल झाले आहेत, तथापि, शेतकरी अजूनही पाणी आणि खते वापराबाबत नियोजनबध्‍द प्रयत्‍न करत नाही. पाण्‍याचा अतिवापर आणि खतांचाही अतिवापर यामुळे होणारे नुकसान शेतक-यांच्‍या लक्षात आणून देण्‍यासाठी आकाशवाणीनेही पुढाकार घ्‍यावा, असे आवाहन त्‍यांनी केले. डॉ. देशमुख यांनी जिल्‍हाधिकारी तसेच विभागीय आयुक्‍त म्‍हणून केलेल्‍या कामांचा अनुभव सांगून शेतकऱ्यांच्‍या विकासासाठी सर्वांगीण प्रयत्‍नांची आवश्‍यकता प्रतिपादन केली.

उपसंचालक गोपाळ अवटी यांनी शेतकऱ्यांच्‍या प्रबोधनासाठी आकाशवाणीच्‍यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात येत असल्‍याचे सांगितले. कृषी विकासावर भर देणारे नावीन्यपूर्ण कार्यक्रम लोकप्रिय असल्‍याचे सांगून त्‍यांनी कृषी विषयाशी संबंधित विविध अँँपबाबत माहिती देणारा कार्यक्रम सादर करणार असल्‍याचे सांगितले.

कार्यक्रम अधिकारी जगदीश राव यांनी 30 जानेवारीपासून दर महिन्‍याला ‘आकाशवाणी आपल्‍या गावात’ हा नवीन कार्यक्रम प्रसारित होणार असल्‍याचे सांगितले. अर्ध्‍या तासाच्‍या या कार्यक्रमात गावाने केलेल्‍या विकासकामांची माहिती तसेच गावकऱ्यांच्‍या मुलाखती प्रसारित केल्‍या जातील. गावांची निवड करतांना त्‍या गावाचा इतर गावांनी आदर्श घ्‍यावा, असे उपक्रम त्‍या गावात असावेत, अशी अपेक्षा त्‍यांनी व्‍यक्‍त केली.