पुणे : कामगार  विभागामार्फत श्री. महेंद्र कल्याणकर (भा.प्र.से.) कामगार आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांचे मार्गदर्शनाखाली बाल मजूरी  या अनिष्ट  प्रथेविरुध्द   दिनांक 07/11/2019  ते 07/12 /2019 कालावधीत राबविण्यात आलेल्या जनजागृती अभियानाचे उद्घाटन जिल्हाधिकारी  नवल किशोर राम   यांचे हस्ते दि. 07/11/2019  रोजी करण्यात आले होते.

पुणे जिल्ह्यामध्ये मा. श्री. शैलेंद्र पोळ, अपर कामगार आयुक्त, पुणे विभाग पुणे व श्री. विकास पनवेलकर, कामगार उप आयुक्त, पुणे जिल्हा पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पुढिल प्रमाणे विविध कार्यक्रम घेण्यात आले. त्यामध्ये  दिनांक 8/11/2019 रोजी  जिल्ह्यातील विटभट्टी आस्थापनांना भेटी देऊन तपासणी करण्यात आली तसेच मालकांकडून/चालकांकडून बालकामगार कामावर न ठेवण्याबाबतचे हमीपत्र भरुन घेण्यात आले. स्थानिक केबल नेटवर्क, रेडिओ स्टेशन, दुरदर्शनच्या माध्यमातून संदेश प्रसारीत करण्यात आले. अंगणवाडी / आशा सेविका यांचे सहकार्याने अत्यल्प उत्पन्न असलेल्या पालकांच्या बैठका घेऊन लहान मुलांना कामावर न पाठविण्याचे प्रबोधन करण्यात आले व दि.09/12/2019 रोजी रिलायन्स मॉल औंध, बालगंधर्व नाटयागृह पुणे, वेस्टेण्ड मॉल औंध, ॲमनोरा हडपसर, ‍फिनीक्स मॉल, नगर रोड या ठिकाणी बालकामगार प्रथेविरुध्द जनजागृती चा भाग म्हणून पथनाटय आयोजित करण्यात आले.

बाल कामगार प्रथा विरोधी जनजागृतीचा भाग म्हणून, चित्रपट गृहांमध्ये चित्रफ़ित प्रदर्शित करण्यात आली. मा. जिल्हाधिकारी श्री. नवल किशोर राम यांनी केलेल्या आवाहना नुसार महानगर पालिका, स्थानिक स्वराज्य संस्था व शासकीय कार्यालयातील कर्मचारी व अधिकारी यांनी बालकामगार न ठेवण्याबाबतची सामुदायिक शपथ घेतली.

विविध औद्योगिक व व्यवसायिक आस्थापनांतर्फे त्यांचे कर्मचारी/अधिकारी यांचे करीता बालकामगार प्रथेविरोधी जनजागृती करुन बालकामगार कामावर न ठेवण्याबाबत आवाहन करण्यात आले. सुप्रसिध्द सिने कलावंत व सामाजिक कार्यकर्ते  श्री. सयाजी  शिंदे यांच्या सहयोगाने लहान मुलांना कामावर न ठेवण्याबाबत मालक वर्गाला भावनिक आवाहन  करण्यात आले. तसेच सेल्फ़ी कटआऊट, बालकामगार प्रथेविरोधी स्वाक्षरी मोहिम भेटीच्या माध्यमातुन शासकीय कार्यालयाचे ठिकाणी जनजागृती करण्यात आली  व  फ़िरत्या वाहनातून दृकश्राव्य माध्यमाव्दारे बालकामगार न ठेवण्याबाबत आवाहन करण्यात आले.

सदर जनजागृती मोहिम समारोपाच्या  प्रसंगी कामगार उप आयुक्त कार्यालयामध्ये कार्याक्रमांचे आयोजन करण्यात आले  दि.07/11/2019 ते 07/12/2019 या कालावधीमध्ये बालकामगार विरोधी मोहिमेचा आढावा घेण्यात आला. कार्यालयातील अधिकारी /कर्मचारी तसेच संघटना/कामगार प्रतिनीधी यांनी स्वाक्षरी मोहिम राबविली. सेल्फीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली . तसेच आस्थापनांमध्ये बालकामगार प्रथेविरुध्द स्टीकर लावण्यात आले.

सदर  बालकामगार प्रथा विरोधी मोहिमेस अमुल्य मार्गदर्शन केल्याबाबत मा. कामगार आयुक्त महाराष्ट्र राज्य, मुंबई, मा. जिल्हाधिकारी पुणे व निवासी उपजिल्हाधिकारी, पुणे यांचे कामगार उप आयुक्त कार्यालय पुणे यांचेवतीने आभार व्यक्त करण्यात आले, तसेच  जनजागृती मोहिमेत एम.आय.टी अभियांत्रिकी महाविदयालयाचे विद्यार्थी, विविध कामगार मालकांच्या  संघटना/ असोसीएशन यांचे पदाधिकारी,अंगणवाडी, आशा सेविका, औद्योगीक क्षेत्रातील आस्थापनांचे मालक/पदाधिकारी, शासकीय/निमशासकीय कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी, यांचे सहभाग तसेच  जिल्हा  माहिती अधिकारी, व दैनिक सकाळ, पुढारी, लोकमत, लोकसत्ता, महाराष्ट्र  टाईम्स, सकाळ टाईम्स,प्रभात,जनशक्ती, द इंडियन एक्सप्रेस व इतर दैनिक वृत्तपत्रांचे प्रतिनिधी यांनी बालकामगार प्रथेविरुध्द राबविलेली विविध कार्याक्रमाच्या बातम्या प्रसिद्ध करुन अभियानास सहकार्य केल्याबद्दल  कामगार उप आयुक्त श्री. विकास पनवेलकर यांनी आभार व्यक्त केले व यापुढेही  बालमजुरी या अनिष्ट प्रथेचे उच्चाटन करण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे असे आवाहन करण्यात आले.

अपर कामगार आयुक्त पुणे विभाग, पुणे व कामगार उप आयुक्त पुणे जिल्हा, पुणे यांनी “बालकामगार या अनिष्ट प्रथेविरुध्द समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन बालकामगार प्रथेचे समुळ उच्चाटन करणेकामी योगदान दयावे” असे आवाहन करुन बालकामगार प्रथाविरोधी मोहिमेची सांगता करत असल्याचे जाहिर केले, अशी माहिती कामगार उप आयुक्त विकास पनवेलकर यांनी दिली.