पुणे : जनगणना, 2021 साठी मास्टर ट्रेनर्सचे राज्य स्तरीय प्रशिक्षण यशदा, पुणे येथे दोन सत्रात संपन्न होत आहे. पहिले सत्र दि. 11 ते 16 डिसेंबर, 2019 तर दुसरे सत्र दि.18 ते 23 डिसेंबर, 2019 दरम्यान संपन्न होणार आहे.

जनगणना 2021 ची पूर्व तयारी यापूर्वीच सुरू झाली असून त्या अंतर्गत यशदा, पुणे येथे मास्टर ट्रेनर्सचे प्रशिक्षण दोन सत्रांमधे आयोजित करण्यात आले आहे.

या सत्रांमध्ये महाराष्ट्रातील सर्व जिल्हे आणि महानगर पालिका मधील नामनिर्देशित 137 मास्टर ट्रेनर्सना तर गोव्यामधील एकूण 4 मास्टर ट्रेनर्सना प्रशिक्षित करण्यात येणार आहे. या प्रशिक्षणामध्ये महाराष्ट्रातील नामनिर्देशित 4 राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षक तर गोव्यामधील 1 राष्ट्रीय प्रशिक्षक प्रशिक्षण देत आहेत.

या पुढील टप्प्यात महाराष्ट्रातील 137 मास्टर ट्रेनर्स तर गोव्यामधील 4 मास्टर ट्रेनर्स त्यांच्या राज्यातील क्षेत्रीय प्रशिक्षकांना मुख्यालयाच्या ठिकाणी प्रशिक्षित करतील. महाराष्ट्रासाठी अंदाजे 5300 क्षेत्रीय प्रशिक्षक तर गोव्यासाठी 56 क्षेत्रीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षण या पुढील टप्प्यात जानेवारी – फेब्रुवारी 2020 मध्ये आयोजित करण्याचे नियोजन आहे.

पहिल्या सत्राच्या प्रशिक्षणाचे उद्घाटन महाराष्ट्राच्या जनगणना संचालिका श्रीमती रश्मी सि. झगडे, भा.प्र.से. यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी मुख्य अतिथीनी नमूद केले की, भारताची जनगणना हा संपूर्ण जगामधील सर्वात मोठे प्रशासकीय कार्य असून त्यामध्ये  मास्टर ट्रेनर म्हणून निवड होणे ही अभिमानास्पद बाब आहे. त्यांनी सर्व प्रशिक्षणार्थीना जनगणनेच्या प्रशिक्षणात उत्साहपूर्वक सहभागी होवून प्रशिक्षणातील माहिती पुढील टप्प्यामध्ये अधिक चांगल्या प्रकारे संक्रमित करण्याचे आवाहन केले.

भारताची दशवार्षिक जनगणना ही जनगणना अधिनियम, 1948 च्या कायदेशीर तरतुदींतर्गत संपन्न होत असल्याचे मुख्य अतिथीनी नमूद केले. भारतीय जनगणनेच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीबद्दल सांगतांना त्यांनी असेही नमूद केले की भारतामध्ये सान 1872 मध्ये पहिली जनगणना केली गेली जी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या संदर्भ कालावधीमध्ये संपन्न झाली. त्यानंतर सान 1881 मध्ये भारतामध्ये सर्व प्रथम एकाच वेळी सर्व ठिकाणी जनगणने अंतर्गत माहिती संकलित केली गेली. तद्नंतर प्रत्येक 10 वर्षानी भारतामध्ये जनगणना अखंडीत शृंखलेत घेण्यात येत आहे. जनगणना, 2021 ही या शृंखलेतील 16 वी तर स्वातंत्र्योत्तर 8 वी जनगणना असणार आहे.

गाव पातळीवर आणि वॉर्ड पातळीवर सर्व शासकीय योजना राबविण्यासाठी जनगणनेची माहिती पायाभूत आकडेवारी म्हणून वापरण्यात येत असल्याने या राष्ट्रीय महत्वाच्या कार्यात सक्रियपणे सहभागी होण्याचे आवाहन याप्रसंगी त्यांनी प्रशिक्षणार्थीना केले. जनगणना 2021 ही दोन टप्प्यात संपन्न होणार असून प्रथम टप्प्यात घरयादी व घरांची गणना आणि राष्ट्रीय लोकसंख्या रजिस्टर अद्ययावत करण्याचे काम होणार आहे.

पहिल्या टप्प्यासाठी राज्य शासनाने एप्रिल ते सप्टेंबर 2020 या कालावधीतील 45 दिवसांचा कालावधी निर्धारीत करावयाचा आहे. तर दुसर्‍या टप्प्यात 1 मार्च 2021 च्या मध्यरात्री 00:00 या संदर्भ वेळेसाठी लोकसंख्येची गणना दि. 9 ते 28 फेब्रुवारी 2021 या कलावधीत संपन्न होणार आहे.