मुंबई : मराठी भाषेचे वैभव जपण्यासाठी व संवर्धनासाठी 1 ते 15 जानेवारी 2020 या कालावधीत मराठी भाषा विभागामार्फत ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ साजरा करण्यात येणार आहे. या कालावधीमध्ये राज्यातील सर्व शासकीय, निम-शासकीय कार्यालय, महामंडळे तसेच राज्यातील केंद्र शासनाच्या अखत्यारितील सर्व कार्यालये, मंडळे, सार्वजनिक उपक्रम सर्व खाजगी व व्यापारी बँका, सर्व शैक्षणिक संस्था, विद्यापीठे, महाविद्यालये आदी सर्व संस्थांमध्ये ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ साजरा करण्यात येणार आहे.

राज्यामध्ये मराठी भाषेचा राजभाषा म्हणून सार्वत्रिक वापर करण्याच्या दृष्टीने सर्व कार्यालय प्रमुखांनी भाषा पंधरवड्यात विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करावे तसेच त्यामध्ये जास्तीत जास्त व्यक्तींचा सक्रीय सहभाग असावा. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा असे फलक सर्व कार्यालयांनी लावावेत असे या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.