मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रामध्ये फार मोठं पर्यटन वैभव आहे. महाराष्ट्राचा हा ठेवा जगासमोर आला पाहिजे. पर्यटन विभाग आणि एमटीडीसी यासाठी व्यापक प्रयत्न करत असून राज्यातील पर्यटनाची देश-विदेशात प्रसिद्धी करुन जगभरातील पर्यटकांना महाराष्ट्राकडे आकर्षित केलं जाईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
भंडारा, गोंदीया जिल्ह्यातल्या नागझिरा अभयारण्यातील पक्षी आणि निसर्गाची चित्र मुंबई-पुणे डेक्कन क्वीनमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहेत. आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या उपक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं. हिरवी झेंडी दाखवून त्यांनी या सुशोभित एक्सप्रेसला रवाना केलं.