मुंबई :  श्रद्धानंद महिलाश्रम संस्थेत दाखल निराधार किंवा हरवलेल्या मुलांचा ताबा मिळावा यासाठी त्यांचे पालक किंवा नातेवाईकांनी सबळ पुराव्यासह 30 दिवसांच्या आत संपर्क साधावा, असे आवाहन मुंबई शहर जिल्हा महिला व बाल विकास अधिकाऱ्यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

हरविलेल्या तसेच निराधार मुलांचा शोध घेऊन बालकल्याण समितीमार्फत त्यांची काळजी घेतली जाते. त्यांना आधार देण्यासाठी समितीकडून प्रयत्न केले जातात.

श्रद्धानंद महिलाश्रमात पोलीस स्टेशनच्या अहवालानुसार तसेच बालकल्याण समितीच्या आदेशानुसार दाखल मुलांची माहिती पुढे नमूद केल्याप्रमाणे असून या मुलांचे पालक किंवा नातेवाईक असल्यास त्यांनी त्वरित संपर्क साधावा. नाव – सितारा ही ६ दिवसांची मुलगी 6 ऑक्टोबर 2019 रोजी प्रभादेवी येथील म्युनिसिपल मॅटर्निटी होम या ठिकाणी पाळण्यात सापडली. जया व लक्ष्मी यादोघी बहिणी दिव्यांग असून वैद्यकीय तपासणीनुसार त्यांचे वय अनुक्रमे 10 वर्ष आणि 12 वर्ष आहे. या मुली 5 जुलै 2019 रोजी सायन येथील लोकमान्य रुग्णालय येथे सापडल्या. अंदाजे 2 ते 3 महिने वय असलेल्या आनंद याला 22 सप्टेंबर 2019 रोजी किंग्ज सर्कल रेल्वे स्टेशनवर माहिम बाजूस लाकडी बाकड्यावर टाकून गेले असल्याचे अज्ञात व्यक्तीने वडाळा पोलीस ठाण्यास कळविले. मुस्कान सुनिता थोरात, मेघा सुनीता थोरात आणि राहूल सुनीता थोरात ही भावंडे अनूक्रमे 11, 8 व 14 वर्षांची आहेत. मुस्कान आणि मेघा 11 जुलै 2019 रोजी मुंबई येथील सी. सी. डी. टी. संस्थेतून बदलीवर व मुंबई शहर बाल कल्याण समिती यांच्या आदेशाने दाखल झाली. तर राहूल याच ठिकाणाहून 14 मे रोजी डॉन बॉस्को या संस्थेत दाखल आहे. या तिघांची आई बेपत्ता आहे व वडीलांबद्दल काहीच माहिती उपलब्ध नाही.

मानसी पायल शेख ही 7 जून रोजी संस्थेत दाखल झाली आहे. तिला मुस्कान आणि मेघा या दोन बहिणी आणि राहूल हा भाऊ आहे. आयेशा जॉन फ्रान्सिस या 14 वर्षांच्या मुलीला पालकांशिवाय भटकत असताना 25 सप्टेंबर 2008 रोजी नागपाडा पोलिसांनी ताब्यात घेतले. आधी आशा सदन संस्था आणि नंतर बी. जे. होम्स संस्थेत दाखल करण्यात आले. 17 ऑक्टोबर 2017 रोजी तिला श्रद्धानंद महिलाश्रमात दाखल केले.

या सर्व मुलांची माहिती ही आपल्या हरविलेल्या मुलांच्या माहितीसोबत जुळत असल्यास पालकांनी किंवा नातेवाईकांनी पुराव्यासह अधिक माहितीसाठी अधीक्षिका, श्रद्धानंद महिलाश्रम, श्रद्धानंद मार्ग, महेश्वरी उद्यानाजवळ, माटुंगा, मुंबई 400011 (दुरध्वनी क्र.022- 24012552, 022-24010715) किंवा परिविक्षा अधिकारी, जिल्हा बाल संरक्षण कक्ष (डिसीपीयू), बीडीडी चाळ नं.117, वरळी, मुंबई 400018 (दूरध्वनी क्र.022-24980908) येथे संपर्क साधावा.