नागपूर : राज्यातील विकास महामंडळांनी शिक्षण, आरोग्य या क्षेत्रासोबतच रोजगार निर्मिती करण्यासाठी प्राप्त निधीचा विनियोग करावा, असे निर्देश राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिले. राजभवनातील सभागृहात 19 डिसेंबर रोजी विदर्भ विकास मंडळ, मराठवाडा विकास मंडळ आणि उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळच्या अध्यक्षांची बैठक राज्यपाल कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
बैठकीला विदर्भ विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार चैनसुख संचेती, मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड आणि उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. योगेश जाधव, राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार,उपसचिव रणजीत कुमार आणि मंडळाचे सदस्य सचिव हेमंतकुमार पवार (विदर्भ) विजयकुमार फड (मराठवाडा)आणि विलास पाटील (उर्वरित महाराष्ट्र) यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, राज्यातील तीनही विकास मंडळांना प्रत्येकी 50 कोटी रुपये निधी देण्यात आला आहे. विकास मंडळांनी या निधीचा विनियोग 31मार्च 2020 पर्यंत करणे आवश्यक आहे. शिक्षण, आरोग्य आणि रोजगार निर्मितीसाठी या निधीचा परिपूर्ण वापर करून त्या क्षेत्रातील मागासलेपण दूर करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करावे. विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा.अनेक लोककल्याणकारी योजनांचा लाभ नागरिकांना मिळाला पाहिजे असे ते यावेळी म्हणाले.
श्री संचेती म्हणाले, विदर्भाच्या विकासाचा आराखडा विदर्भ विकास मंडळाने तयार केला आहे. विदर्भातील सर्वच 11 जिल्ह्यांचा सरासरी मानवी विकास निर्देशांक 752 इतका आहे.गडचिरोली बुलडाणा, गोंदिया आणि वाशिम या जिल्ह्याचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्यात आले आहे तसेच या जिल्ह्याचा अभ्यास अहवाल तयार करण्यात आला आहे. विदर्भात मत्स्योत्पादनात मोठा वाव असून यातून मासेमारी बांधव आणि शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
श्री. कराड म्हणाले, मराठवाडा हा अविकसित आणि दुष्काळी भाग आहे. पाऊस दरवर्षी या भागात कमी पडतो. त्यामुळे शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागतो. नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून सिंचनाची सुविधा या भागात निर्माण झाल्यास दुष्काळी परिस्थितीवर मात करता येणे शक्य आहे. मराठवाड्यातील दोन्ही विद्यापीठाच्या माध्यमातून विकासाला चालना देण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे.औरंगाबाद येथे पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी आणि त्या माध्यमातून रोजगार निर्मिती करण्यासाठी औरंगाबाद येथे पर्यटन विद्यापीठ स्थापन व्हावे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
श्री. जाधव म्हणाले, उर्वरित महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये आलेल्या अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण झाली या पूर परिस्थितीमुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी मराठवाडा विकास मंडळाने विकासाच्या नियोजनाचे सादरीकरण केले. पब्लिक हेल्थ फाउंडेशन दिल्लीचे डॉक्टर राज यांनी स्वास्थ सहाय्य या उपकरणाची यावेळी माहिती दिली. आरोग्य सेवेमध्ये विविध आजारांच्या चाचण्या करण्यासाठी या उपकरणाची उपयुक्तता विषद केली.