पुणे – लोकसभा निवडणुकीत निवडून आल्याने खासदार गिरीश बापट यांनी त्यांच्याकडील अन्न व नागरी पुरवठा खाते आणि संसदीय कामकाज मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंगळवारी दिला. तसेच, पुण्याच्या पालकमंत्रिपदाचा राजीनामा विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे सुपूर्त केला. “राजकारणातील प्रगतीसाठी नव्हे, तर केंद्र सरकारकडून अधिकाधिक निधी आणून पुण्याचा विकास करण्यासाठी लोकसभेत गेलो आहे,’ अशी भावना या वेळी बापट यांनी व्यक्त केली.
राज्याच्या विधिमंडळात गेल्या 25 वर्षांपासून बापट हे कसबा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. गेल्या साडेचार वर्षांपासून त्यांच्याकडे पुण्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी होती.
मात्र, लोकसभा निवडणुकीत ते निवडून आल्याने त्यांना मंत्री आणि पालकमंत्रिपदाचा राजीनामा देणे बंधनकारक होते. त्यानुसार त्यांनी या पदांचे राजीनामे दिले आहेत. बापट म्हणाले, “”पालकमंत्री म्हणून पुण्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांना मंजुरी मिळवून देत त्यांच्या अंमलबजावणीवर भर दिला आहे. त्यात पीएमआरडीए, मेट्रो, नवे आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि लोहगाव विमानतळाच्या विस्तार आदी कामांना प्राधान्य दिले.
या पुढील काळातदेखील अन्य योजनांसाठी पुरेसा निधी आणून त्यांची उभारणी केली जाईल. खासदार म्हणून आता जबाबदारी आणखी वाढली आहे.”