मुंबई : बोहरा समाज प्रामाणिक असून देशाच्या विकासात त्यांचा महत्त्वाचा सहभाग आहे. रमजानच्या पवित्र महिन्यात ईद सण साजरा करीत असताना त्याचा आनंद व इतर सर्व सणांचा आनंद गरीबांपर्यंत पोहोचला पाहिजे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

डोंगरी येथील नाझम बाग, उमरखाडी येथे आयोजित इफ्तार कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. या कार्यक्रमास राज्याचे जलसंपदा तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन, पदुममंत्री महादेव जानकर, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, माजी मंत्री संजय देवतळे,आमदार राज पुरोहित, शायना एन.सी,बोहरा समाजाचे जैनुद्दीन झवेरी आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, बोहरा समाजाने देशात आपली एक वेगळी ओळख मिळविली आहे. रमजानच्या पवित्र महिन्यात ज्यांनी रोजा ठेवला त्यांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात आणि ईदनिमित्त सर्व समाजबांधवांना मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शायना एन.सी. यांनी केले. यावेळी बोहरा समाजाचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.