मुंबई : राज्य तसेच राष्ट्रीय वन नीतीनुसार एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ३३ टक्के क्षेत्र हे वनक्षेत्र असले पाहिजे हे लक्षात घेऊन हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या जिल्ह्याच्या विकास आराखड्याप्रमाणे वृक्षलागवडीचा आराखडा अर्थात टी.पी. प्लॅन तयार करावा अशा सूचना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.

येत्या पावसाळ्यात जुलै ते सप्टेंबर २०१९ या तीन महिन्याच्या काळात राज्यात लोकसहभागातून ३३ कोटी वृक्षलागवड करण्यात येणार आहे. वनमंत्र्यांनी कोकण विभागाचा यासंबंधीचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी  वित्त व नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्यासह त्या त्या जिल्ह्याचे स्थानिक लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्याचे वनक्षेत्र वाढले तर राज्याला आज सोसाव्या लागणाऱ्या दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागणार नाहीत, असे सांगून श्री. मुनगंटीवार म्हणाले की, कोकण विभागाचे वृक्षलागवडीचे नियोजन चांगले झाले आहे. त्यावर आता अचूक अंमलबजावणी केली जावी. वृक्ष लावणे हे एकट्या वन विभागाचे काम नाही. यात समाजातील सर्व घटकांचा सहभाग तितकाच महत्त्वाचा आहे. या सर्वांनी एकत्रित योगदान दिले तरच हे वृक्षधनुष्य उचलणे सोपे जाणार आहे. वृक्ष लागवड ही जशी हरित महाराष्ट्रासाठी आवश्यक आहे तशीच ती उपजीविकेचे साधन निर्माण करण्यासाठी ही उपयुक्त आहे त्यामुळे मनापासून वनाच्या वाढीसाठी प्रयत्न केले जावेत.

राज्यातील वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमाला गती देण्यासाठी तसेच यास आर्थिक पाठबळ मिळण्यासाठी वन विभागाने अनेक निर्णय घेतले असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. ते म्हणाले की, प्रत्येक प्रशासकीय विभागाला उपलब्ध करून देण्यात आलेल्या वित्तीय तरतुदीच्या ०.५ टक्के निधी वृक्षलागवडीवर खर्च करता येणार आहे. आमदारांच्या स्थानिक विकास कार्यक्रमातूनही वृक्षलागवडीसाठी निधी घेता येईल.  जिल्ह्याच्या खनिज विकास निधीतून काही निधी वृक्षलागवडीसाठी वापरता येईल. विविध कंपन्यांचा सामाजिक दायित्व निधी आहे.  निधी खर्च करण्याची त्यांची तयारी आहे परंतु तो कसा करायचा याचे मार्गदर्शन जिल्हाधिकाऱ्यांनी केल्यास या निधीचा उपयोग वृक्षलागवड आणि यासंबंधीच्या कामासाठी अतिशय उत्तम प्रकारे करता येऊ शकेल.

ज्या प्रशासकीय विभागांनी वृक्ष लावले आहेत परंतु त्यांना ते जगवताना अडचणी येत आहेत त्यांनी एफडीसीएमसमवेत करार करून हे काम त्यांना दिले तरी चालेल असे सांगून त्यांनी जगातील सर्वात मोठी १ कोटी लोकांची हरित सेना निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने नोंदणी करावी असे आवाहन केले. महाराष्ट्रात हरित सेनेचे ६१ लाखांहून अधिक सैनिक आहेत याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला.

दीपक केसरकर यांनी यावेळी कोकणातील वृक्षलागवडीचे उद्दिष्ट निश्चित करताना ग्रेझिंग ग्राऊंडस सुरक्षित ठेवले जावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यामुळे वन्यप्राण्यांमुळे होणारे शेतीचे नुकसान व मानव वन्यजीव संघर्ष टाळणे शक्य होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार मनिषा चौधरी, आमदार सुनील प्रभु यांच्यासह इतर मान्यवरांनी वृक्षलागवडीसंदर्भातील आपली मनोगते मांडली.

१५ जून पर्यंत कामे पूर्ण करा- विकास खारगे

१५ जून पर्यंत  विभागाच्या वृक्षलागवडीसाठी जागा शोधणे, खड्डे पूर्ण करणे अशा कामांची पूर्तता केली जावी अशा सूचना वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी दिल्या. पावसाळ्याच्या तीन महिन्यात ३३ कोटी वृक्षलागवडीचा कार्यक्रम पार पडणार आहे. त्याचे आठवडानिहाय नियोजन केले जावे, वृक्षलागवडीचे कार्यक्रम,स्थळे, मान्यवरांना निमंत्रणे या सर्व गोष्टींची दखल त्यात घेतली जावी. वृक्षलागवडीच्या कामात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भूमिका अधिक महत्त्वाची असल्याचेही ते म्हणाले. जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या कामाला गती देण्यासाठी पंधरा दिवसाला आढावा बैठका घ्याव्यात, लोकसहभाग वाढवण्यासाठी प्रेस कॉन्फरन्स घेऊन लोकांना जिल्ह्यातील वृक्षलागवडीच्या कामाची माहिती द्यावी. वृक्षलागवडीच्या कामात पारदर्शकता आली तरच लोकांची त्यातील विश्वासार्हता वाढेल हे लक्षात घेऊन केलेले काम अक्षांश रेखांशासह संकेतस्थळावर अपलोड करावे असेही ते म्हणाले.

उदि्दष्टापेक्षा अधिक वृक्षलागवडीसाठी कोकण विभाग सज्ज!

ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी,सिंधुदुर्ग, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर अशा सात जिल्ह्यांना मिळून कोकण विभागासाठी एकूण ३५६.१७ लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. विभागात ४२० रोपवाटिका असून या रोपवाटिकांमध्ये ३९४.२४ लाख रोपे लागवडीसाठी उपलब्ध आहेत. विभागात ८.३२ लाख लोकांनी हरित सेनेचे सदस्यत्व स्वीकारले आहे. रानमळा पॅटर्न अंतर्गत विभागात जन्म वृक्ष, आनंद वृक्ष, शुभ मंगल वृक्ष,माहेरची झाडी, कन्या वन समृद्धी योजना यासारख्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमातून ७९ हजार २०० झाडे लावली गेली आहेत अशी माहिती बैठकीत देण्यात आली. देण्यात आलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिक वृक्ष लागवडीसाठी विभाग सज्ज असल्याची ग्वाही या वेळी देण्यात आली.