नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ ची महामारी आणि त्यानंतर लावलेल्या देशव्यापी लॉकडाऊन मुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरता ऑनलाईन अभ्यासक्रमाचा पर्याय पडताळून पाहण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगानं २ समित्या नेमल्या होत्या. त्यांनी काल आपापले अहवाल केंद्रसरकारला सादर केले.

देशातल्या उच्च शिक्षण संस्था आणि विद्यापीठांचं आगामी शैक्षणिक वर्ष जुलै ऐवजी सप्टेंबर पासून सुरु करावं अशी शिफारस आयोगाने याकरता नेमलेल्या समितीने केली आहे. दुसऱ्या समितीनं म्हटलं आहे की, आवश्यक पायाभूत सुविधा असतील तर विद्यापीठांनी लॉकडाऊन संपण्याची वाट न पाहता ऑनलाईन परीक्षा घ्यायला हरकत नाही.

या शिफारशींचा अभ्यास करुन दिशानिर्देश जारी होतील, असं केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितलं.

राज्यात विद्यापीठ आणि महाविद्यालयांच्या परीक्षेसंदर्भात विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सूचना प्राप्त झाल्यानंतरच निर्णय होईल, असं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे. सामंत यांनी काल सर्व अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंशी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की विद्यार्थ्यांनी चुकीच्या माहितीवर आणि अफवांवर विश्वास ठेवू नये .

ऑनलाईन अध्यापन सध्या सुरू असून, ऑनलाईन परीक्षासंदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, विद्यार्थ्यांना परीक्षेसंदर्भात वेळोवेळी माहिती दिली जाईल तसंच परीक्षेपासून कोणताही विद्यार्थी वंचित राहणार नाही, याची संपूर्ण काळजी घेतली जाईल, असं त्यांनी सांगितलं.