नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूचा हॉटस्पॉट वा प्रतिबंधित क्षेत्र- कंटेंनमेंट झोन नसलेल्या काही भागातली दुकानं उघडायला केंद्रीय गृह मंत्रालयानं परवानगी दिली आहे.
महानगरपालिका आणि नगरपालिका क्षेत्राबाहेरच्या बाजार परिसरात असलेल्या दुकानांना ५०% कर्मचारी उपस्थिती, सुरक्षित अंतर राखणं, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर अशा अटींवर टाळेबंदीच्या नियमातून सूट दिली आहे. मात्र बाजार संकुलं आणि मॉल्समधली दुकानं उघडायला परवानगी दिलेली नाही, असं केंद्रीय गृह मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.
ई- कॉमर्स कंपन्यांना केवळ जीवनावश्यक वस्तूच विकता येतील, तसंच मद्यविक्रीवर बंदी कायम असल्याचं सरकारी आदेशात म्हटलं आहे.
केंद्र सरकारनं आजपासून महानगरपालिका आणि नगरपरिषदांच्या हद्दीत हॉटस्पॉट नसलेल्या परिसरात दुकान सुरू ठेवायला सशर्त परवानगी दिली असली. तरी याबाबत राज्यशासन आणि महानगरपालिकेकडून स्पष्ट निर्देश आल्याखेरीज दुकानं उघडणार नसल्याचं दुकानदारांनी ठरवलं आहे.
स्थानिक प्रशासनाकडून स्पष्टता येईपर्यंत दुकान उघडण्याची घाई करू नये, असं आवाहन रिटेलर असोसिएशन ऑफ इंडियानं आपल्या सदस्यांना केलं आहे.