नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर भारतात थंडीची लाट कायम असून राजधानी दिल्लीत आतापर्यंतचं यंदाच्या मोसमातलं सर्वात कमी तापमान नोंदलं गेलं. दिल्लीत काल पारा 4 पूर्णांक 2 अशं सेल्सियसवर स्थिरावला होता.
जम्मू कश्मिरमधेही कडाक्याची थंडी पडली असून श्रीनगरमधे काल रात्री उणे 5 पूर्णांक 6 अंश सेल्सियस एवढं तापमान नोंदलं गेलं. हिमाचल प्रदेशात कुफ्री, मनाली, सोलन, भुंटर, सुंदरनगर आणि कल्पा इथं तापमान शून्य अंशाखाली राहिलं. केलाँग इथं उणे 15 अंश सेल्सियस एवढ्या किमान तापमानाची नोंद झाली.
राजस्थानमधेही ब-याच भागात थंडीची लाट आहे. फतेहपूर शहरात उणे तीन अंश सेल्सियस एवढं तापमान नोंदलं गेलं. आगामी दोन दिवसात उत्तर पूर्व आणि मध्य भारतात थंडीची लाट कायम राहील असा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. 31 डिसेंबर नंतर या भागातली थंडीची लाट ओसरेल, असं हवामान खात्यानं म्हटलं आहे.