नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संरक्षण दलाच्या सर्व शाखांमध्ये समन्वय आणि एकात्मता निर्माण व्हावी यासाठी, कालबद्ध शिफारसी देण्याचे निर्देश संरक्षण दल प्रमुख बिपीन रावत यांनी सर्व दलांच्या प्रमुखांना दिले आहेत. पदभार स्वीकारल्यानंतर रावत यांनी एकात्मिक संरक्षण दल मुख्यालयातल्या महत्वाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली, त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले.
यावर्षी ३० जूनपर्यंत हवाई संरक्षण कमांड तयार करण्यासाठीचा प्रस्तावही तयार करावा, असे निर्देशही त्यांनी दिले. तीन्ही दलांमधल्या समन्वयासाठीच्या प्राधान्यानं करायच्या गोष्टी ३० जून आणि ३१ डिसेंबरपर्यंत निश्चित कराव्यात, अशी सूचना त्यांनी केली. संसाधनाचा योग्य वापर करणं, तसंच इतर पायाभूत सोयीसुविधा; विशेषतः अधिक मनुष्यबळाचा वापर होत असलेल्या सुविधा कमी करण्यावर भर दिला जाईल, असं रावत यांनी या बैठकीत सांगितलं.
यावेळी रावत यांनी निश्चित केलेली कामं, अपेक्षित उद्दिष्टांसह पूर्ण व्हावीत तसंच त्यातून उत्तम कल्पनांनाही वाव मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.