मुंबई : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाला मुख्य सचिव अजोय मेहता यांनी भेट दिली. आपत्ती निवारणासाठी केलेले नियोजन याबाबत मुख्य सचिवांनी यावेळी आढावा घेतला. आपत्ती उद्भवल्यास विविध विभागांशी समन्वय साधून नागरिकांना सतर्क करतानाच त्यांना वेळेवर आवश्यक ती मदत होण्यासाठी नियंत्रण कक्षाने तत्पर असावे, असे मुख्य सचिवांनी यावेळी सांगितले.
मंत्रालयतील नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत असतो. पावसाळ्यातील 4 महिने अधिक सजगतेने काम करुन नागरिकांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे. पावसाळ्यात होणारे वादळ, वीज पडणे, अतिवृष्टी याप्रसंगी मंत्रालयातील आपत्ती निवारण कक्षाकडे नागरिकांचे दूरध्वनी येत असतात. त्याच बरोबर अन्य विभागांना देखील यासंदर्भात अद्यावत माहिती आवश्यक असते. त्यामुळे या कक्षाची भूमिका महत्त्वाची ठरते, असे श्री. मेहता यांनी यावेळी सांगितले.
पावसाळ्यात मुंबईतील नागरिकांना रस्ते, रेल्वे वाहतुकीबाबत तसेच भरतीच्या वेळा याबाबत माहिती देतानाच प्रत्येक विभागाशी समन्वय राखणे महत्त्वाचे असल्याचे मुख्य सचिवांनी सांगितले. यावेळी मुख्य सचिवांनी नियंत्रण कक्षाची पाहणी केली. मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर, मंत्रालय नियंत्रण कक्षाचे सह सचिव अरुण उन्हाळे, आपत्ती व्यवस्थापन संचालक अभय यावलकर आदी अधिकारी उपस्थित होते.
राज्यातील धरणातील साठा, हवामान खात्याचा अंदाज, कृषी व महसूल विभागाकडून प्राप्त होणारी पावसाची आकडेवारी याविषयक माहिती,उष्णतेची लाट, तसेच गारपीट याबाबत मिळणारी माहिती, सूचना व उपाययोजना राज्यातील संबंधित विभागांना व जिल्ह्यांना कार्यवाहीसाठी पाठविले जाते.
मंत्रालय नियंत्रण कक्षाकडून दर तासाला महत्त्वाच्या महानगरपालिकांकडून तसेच दर 3तासनंतर विभागीय आयुक्त कार्यालय यांच्याकडून दैनंदिन घटनाबाबत माहिती घेऊन अहवाल तयार करण्यात येतो.
मंत्रालय नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक
मुख्य दूरध्वनी – 022 22027990; 22794229
फॅक्स नंबर – 022 22023039
सॅटेलाईट फोन नंबर – 8991119253
ई-मेल –controlroom@maharashtra.gov.in