नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवभारताच्या निर्मितीसाठी अभिनव तंत्रज्ञान आणि त्याचा प्रसार करण्याच्या दृष्टीने तर्कशुद्ध विचारधारा अंगीकारणं आवश्यक आहे, असं मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे. ते बंगळुरु इथं १०७ व्या भारतीय विज्ञान परिषदेचं उद्घाटन केल्यावर बोलत होते.

विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातल्या यशावर भारताची विकासगाथा अवलंबून आहे, असं त्यांनी सांगितलं. देशाचा जलद गतीनं विकास घडवण्यासाठी शास्त्रज्ञांनी नवोन्मेष, स्वामित्व हक्क, उत्पादन आणि भरभराट या चार तत्वांवर वाटचाल करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शास्त्रज्ञांना केलं आहे.

अंतराळ क्षेत्रातल्या  यशस्वी वाटचालीनंतर शास्त्रज्ञांनी आता खोल समुद्रातल्या शोधकार्याला प्राधान्य द्यावं, असं आवाहन त्यांनी केलं. सर्व प्रकारच्या टाकाऊ पदार्थांपासून उपयुक्त सामग्री तयार करण्याचे लवकरात लवकर प्रयत्न झाले पाहिजेत, अशी सूचना त्यांनी केली.

२०२२ पर्यंत खनिज तेलाच्या आयातीत १० टक्के कपात करण्याचं भारताचं उद्दिष्ट आहे. त्यामुळे बायो-इंधन आणि इथेनॉल उत्पादनाशी संबंधित क्षेत्रात स्टार्ट अप्स उद्योग सुरू करण्यासाठी मोठ्या संधी उपलब्ध आहेत, असं ते म्हणाले.