नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बीपीसीएल, अर्थात भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड या सार्वजनिक क्षेत्रातल्या उद्योगाचं खासगीकरण करण्याच्या केंद्र सरकारनं प्रयत्नांना बीपीसीएल अधिकारी संघटनेनं तीव्र विरोध केला असून, खासगीकरणाविरोधात येत्या ८ जानेवारी रोजी होणाऱ्या औद्योगिक संपात सहभागी होण्याची घोषणा केली आहे.

बीपीसीएल ही तेल क्षेत्रात देशातली दुसरी मोठी कंपनी आहे. भारतीय भाग बाजारातील २४ टक्के समभाग या कंपनीकडे असून २०१८-१९ या आर्थिक वर्षात कंपनीचा सुमारे ७ हजार १३२ कोटी इतका निव्वळ नफा सरकारी तिजोरीत जमा झाला. ही आनंदाची बाब असल्याची माहिती भारत पेट्रोलियम ऑफिसर्स असोशिएशनचे अध्यक्ष अनिल मेढे यांनी दिली.

या कंपनीचं खासगीकरण करण्याचा सरकारचा प्रयत्न असून त्यामुळे कंपनीचं सार्वभौमत्व धोक्यात आलं आहे, तसंच या सार्वजनिक उपक्रमाचं खासगीकरण केल्यानं राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याची भिती त्यांनी व्यक्त केली. देशातील विविध कामगार संघटनांनी देशव्यापी संपाची हाक दिली आहे. या औद्योगिक संपात आमचीही कामगार संघटना सहभागी होणार असल्याची माहिती अध्यक्ष मेढे यांनी दिली.